हॉस्टेलमध्ये राहण्याचा अनुभव एकदातरी घ्यावाचं असं म्हणतात. कारण घरापासून दूर राहिल्यावर आपल्याला जबाबदारीची जाणीव होते. आलेल्या वेगवेगळ्या अनुभवामुळे आपण घडतो. त्यामुळे कॉलेज घरापासून लांब असेल, पोहोचायला एक – दिड तास लागणार असेल तर तो वेळ वाचवून कॉलेजजवळ असणाऱ्या हॉस्टेलमध्ये राहणे हा सध्याचा ट्रेंड बनलाय. कारण त्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचतोच, शिवाय अभ्यासासाठी(?), फ्रेंड्सबरोबर जास्त वेळ देता येतो. महत्वाचं म्हणजे पैसेही वाचतात.
हॉस्टेलमध्ये राहताना बरेच नवे अनुभव गाठीशी येतात. मूलभूत गोष्टींची आधीच काळजी घेतली जाते. त्यात महत्वाचं म्हणजे खोली साफ करण्याची जबाबदारी, डब्याची जबाबदारी, कपडे धुण्याचा दिवस हे सगळं नीट नियोजन करावं लागतं. काही हॉस्टेलमध्ये या सुविधा दिल्या जातात, तर काही ठिकाणी तुमची सोय तुम्हाला करावी लागते. अशावेळी योग्य नियोजन केल्यामुळे या गोष्टी पुढील काळासाठी सोप्या होतात. हॉस्टेलच्या जवळ आता अशा सोयी सहज उपलब्ध असतात. यातून नियोजन, निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते.
आजकाल मुलांना थोडी प्रायव्हसी लागते. त्यांचं प्रत्येक गोष्टीत स्वत:चं एक मत असतं. अशावेळी हॉस्टेलमध्ये राहिलं की स्वत:चे निर्णय घेऊन परिणामांनाही सामोरं जायची त्यांची तयारी असते. इतर तणावांचा, उत्तरांचा सामना त्यांना करावा लागत नाही. हॉस्टेलमध्ये एकटं राहताना किंवा ग्रुपने राहतानाही तुम्हाला प्रायव्हसी जपता येते. या अनुभवातून निर्णय घेण्याची क्षमता तपासून पाहता येते.
क़ॉलेजजवळ हॉस्टेल असल्याने मित्रांसोबत मिळून कितीही वेळ अभ्यास, मजा-मस्ती करता येऊ शकते. यातून तुमच्यात मैत्रीचा घट्ट बंध निर्माण होऊ शकतो. एकत्र डबा शेअर केल्याने, अभ्यास केल्याने एकमेकांचे विचार कळायला मदत होते. शिवाय कॉलेजजवळ हॉस्टेल असल्याने वेळेचे बंधन राहत नाही. या काळात चांगल्या-वाईट मित्रांची पारख होऊन त्यातून चांगले मित्र शोधले जातात. हा अनुभव भरपूर समृद्ध करणारा असतो.
एकमेकांचे वाढदिवस साजरे करणं असो. मनाजोगे चांगले वाईट अनुभव घेणं असो, मित्रांबरोबर केलेली खरेदी असो. एकत्र डबा खाणं असो. भांडणं असो. वाईट अनुभवामुळे येणारं शहाणपण असो… असे सगळे अनुभव तुम्हाला हॉस्टेलमधल्या आयुष्यात मिळतात. त्यातलं काय चांगलं- काय वाईट हे मात्र ओळखता यायला हवं. हे एकदा जमलं की हॉस्टेलमधलं आयुष्य समृद्ध अनुभवांचा खजिना होऊन जातं.