टिकटिक वाजते डोक्यात… धडधड वाजते ठोक्यात… जीव अडकला मोत्यात… हेच अगदी हेच दुनियादारी पिच्चरमधलं गाणं आठवलं तिला पाहिल्यावर…. दुनियादारीतल्या शिरीनच्या सौदर्यावर जसा तो हिरो भाळला होता ना… अगदी तसंच मला झालं तिला पहिल्यांदा बघितल्यावर. तिला बघितलं तरी कुठे तर लायब्ररीत अभ्यास करताना!
मला आताही तिचा चेहरा स्पष्टपणे आठवतो. शॉर्ट केस, लॉंग वन पीस, त्यावर साजेसे कानातले आणि तिच्या व्यक्तीमत्वाला शोभेल अशी लिपस्टीक. कमालीची पॉझिटिव्ह एनर्जी तिला पाहून तुम्हाला मिळेल असा देखणा चेहरा. इतका सुंदर आणि आश्वासक चेहरा मी पहिल्यांदाच पाहत होतो. आम्ही लायब्ररीत पुस्तक बदलायला आलो होतो. ती पुस्तक चाळत असताना तिच्या हातातल्या कडांचा होणारा आवाज माझ्या मनाला स्पर्शून गेला. एकदम क्लिकच झाली. मनात चलबिचल झाली. आपण कशाला आलो आहोत, इथे. अभ्यासासाठी पुस्तक घ्यायला. मग घेऊया आधी. ती पुन्हा भेटेल न भेटेल. पण लकीली आम्हाला एकाच विषयाचं पुस्तक हवं होतं. आणि तेही एकच होतं तिथे, मग आमच्यात चक्क पुस्तकाविषयी बोलणं झालं. आणि कसं शेअर करता येईल हेही बोललो. आई शप्पथ या निमित्ताने आता ती मला दररोजच भेटणार होती. पण भेटीचं ठिकाण होतं अर्थात लायब्ररी…
माझ्या मित्राचे बाबा त्यांच्या वेळच्या लायब्ररीतल्या प्रेमकधा सांगत होते. आणि आम्हाला ते ऐकताना भारी मजा येत होती. आता कसं गर्लफ्रेंड पटवायला फारसा वेळ लागत नाही. शाईन मारली कि मुली तयार होतात काही. पण जर तुम्ही त्या गावचेच नसाल तर तुम्हालाही अशी लायब्ररीत एखादी मुलगी आवडू शकते, मध्येच काकांनी सांगितलं. काकांना आम्ही तुमच्या प्रकरणाचं काय झालं?तीला कसं पटवलं हे विचारलं. तर काका म्हणाले. मी अर्थातच मनाशी पक्क ठरवलं होतं कि तिच्याशी अभ्यासाचंच बोलायचं. पण ती समोर आली की तिच्यातला साधा पण मनमोहक लूक बघून तिच्याकडे बघतच राहायचो. तिला एकदा ते लक्षात आल्यावर तर ती मला बघून हसायलाच लागली. हळूहळू आमच्या अभ्यासाव्यतिरिक्त गप्पा व्हायला लागल्या. आम्हाला कंपनी आवडायला लागली. पुस्तकाच्या निमित्ताने भेटत होतो, पण त्या पुस्तकातला अभ्यास आता संपत आला होता. एकमेकांच्या भेटीची, सहवासाची ओढ असायची. लायब्ररीत बसून जे दोन तास मिळायचे ते हवेहवेसे वाटायचे. पण अभ्यास संपला तसं आमच्या भेटी कमी झाल्या. माझ्या मनात तिच्याविषयी असलेल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवताच आल्या नाहीत. हळहळत राहण्यापेक्षा आता तिला थेट विचारायचं. असं ठरवलं. पण मजा म्हणजे तिने दुसऱ्या मुलाबरोबर लायब्ररीत अभ्यास सुरू केला होता. त्या मुलाला पाहून त्याचीही अवस्था माझ्यासारखीच आहे की काय असं मला वाटायचं. मग मी पण तिचा नाद सोडून दिला.
मजा म्हणजे, तेव्हा तर माझे इतर मित्रही लायब्ररीत एखादी मुलगी पटते का हे शोधत असायचे. एकाने तर लायब्ररीच्या पुस्तकात लव्हलेटर लिहून ते पुस्तक समोरच्या मुलीला दिलं. तिने त्यावर चक्क प्रतिक्रिया देत त्याचं प्रेम कबूल केलं. पण ते अभ्यासाच्या बहाण्याने बिनधास्त भेटू शकायचे ते लायब्ररीत. लायब्ररीत अनेकांनी आखोंकी गुस्ताखिया केली. तर चक्क ओळख काढत एकमेकांविषयी जाणून घेतलं. एका मित्राने तर लायब्ररीतच त्याची आयुष्याची साथीदार शोधली. थोडक्यात काय ही लायब्ररी पुस्तकांबरोबर तुमच्या आयुष्याचंही एक पान किलकिलं करते. तुम्हाला प्रेमात पडायला लायब्ररीत एकत्र घालवलेले काही तासही पुरतात. आताही काहीजणांना लायब्ररीतली एखादी मुलगी आवडते. ते प्रेमप्रकरण लायब्ररीच चांगलंच गाजतं.
सो, तुम्हाला कसं आणि कुठे प्रेमाची सुरूवात करायला आवडेल हे तुम्हीच ठरवा. शेवटी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं… लायब्ररीत जडलं तर मात्र वेगळं असते.