हॉस्टेलमध्ये राहण्याचं थ्रील काही वेगळंच असतं बॉस. प्रत्येकाने हॉस्टेल लाईफचा अनुभव घ्यायलाच हवा. पण हे सुख तुमच्यासारख्या काही लोकांनाचं मिळतं राव. कारण तुम्ही दूरवरून चांगलं शिक्षण घेण्यासाठी पुण्यासारख्या शहरात आला आहात. त्यामुळे हॉस्टेलमध्ये राहण्यावाचून नो पर्याय.
तुमच्या आयुष्याला खरा आकार देणारे, तुम्हाला सगळ्या बाजूंनी टफ बनवणारे दिवस म्हणजे हे हॉस्टेलचे दिवस. कारण रोजच्या अनुभवातून घडायचंय कि ‘बि’घडायचंय हे तुमच्या हातात असतं. आता हॉस्टेलला राहायचं म्हटलं तर एकट्यानेच राहायचं की रूम शेअर करून ४,५ मुलांबरोबर राहायचं हा चॉईस असतो. तुम्ही पीजी म्हणूनही राहू शकता. गर्ल्स आणि बॉईज हॉस्टेलमध्ये येणारी मजा, अनुभव वेगळे पण खूप समृद्ध करणारे असतात. आणि हेच थ्रील अनुभवण्यासाठी तुम्ही नव्या शहरात यायया फार उत्सुक असता. तुमची उत्सुकता आणि आई-वडिलांची काळजी, पण चांगलं कॉलेज-हॉस्टेल मिळाल्याचं समाधान अशा मिक्स फिलिंगसह तुम्ही नव्याने हॉस्टेलमध्ये येता… त्यानंतर सुरू होतो तो खरा प्रवास…
आता हेच बघा, नव्या शहरात यायचं असतं, तिथे खायला काय मिळेल? आपल्या मुलाला आवडेल का? या काळजीपोटी तुमची माऊली जेवढे जमतील तेवढे पदार्थ म्हणजे लाडू, चिवडे, परोठे, दशम्या, लोणचं. चकली…. असं काय काय भरून देते. चांगली मेस मिळेपर्यंत जरा आधार हा त्याचा खरंतर उद्देश. तुम्ही हॉस्टेलवर इतर मित्रांशी शेअर करून राहायला सुरूवात केल्यावर साहजिकच तुम्ही तुमच्यातला थोडा खाऊ त्यांना देता. त्यांचा खाऊ तुम्ही खाता, आणि याच खाऊने तुमच्यातली वेव्हलेंथ जुळते. आवडी-निवडी शेअर होतात. हळूहळू गप्पांमधून एकमेकांना जाणून घेता. रूममेट अभ्यासू असेल तर आई-वडिल निर्धास्त होतात. कारण टीपी कमी अभ्यास जास्त होईल असं त्यांचं मत. ते एकाअर्थी बरोबरही असतं. दरम्यान हॉस्टेलमधल्या इतर मुलांशी/मुलींशी तुमची मैत्री होते. काही मुलं स्वभावाने चांगली, तर काही अत्यंत खोडकर, तुमचा बकरा करणारी असतात. जसे जसे अनुभव येत जातात, तसे कोण चांगलं कोण वाईट हे लक्षात येऊन तुमचे मित्र-मैत्रीण ग्रुप तयार होतात.
हॉस्टेलचे मित्र एकाच कॉलेजमध्येही असल्याने तुम्ही एकमेकांबरोबर तसा बराच काळ घालवता. अभ्यास हा त्यातला महत्वाचा दुवा असतो. रात्री जागून अभ्यास करणं, नोट्स पूर्ण करणं, परिक्षेच्या वेळी तर गजर लावून अभ्यास करणं, एखाद्याला अडचण आली तर ती सोडवणं, अशामुळे तुमच्यातल्या प्रत्येकाला एक चांगला मित्र-मैत्रीण मिळाल्याचं समाधान मिळंतं. अभ्यास करताना कॉफी पिता पिता करण्यात मजा येत असल्याने तुम्ही तोही प्लॅन करता.
अभ्यासाबरोबरच फिरायला जाणं, हॉटेलिंग, पिच्चर टाकणं, एखाद्या मित्राच्या बाईकवरून लेक परिसरात फिरायला जाणं हमखास होतंचं. त्यात एक वेगळी मजा आहे. तुमचा एखादा नातेवाईक जर जवळ राहात असेल तर त्याच्याकडे तुम्ही विकेंडला चक्कर टाकता. कधीकधी त्या मित्रालाही सोबत नेता. थोडक्यात काय तर एकटेपणा वाटू नये यासाठी तुमचे प्रयत्न सुरू असतात. अर्थात हे सगळं करताना पैसे शेअऱ केले जातात. पैसे कसे जपून वापरावे, शेअरिंग कसं करावं. समोरच्या व्यक्तीची वागणूक, आपले विचार, संस्कार हे सगळं या काळात खूप शिकायला मिळतं.
हॉस्टेल ज्या प्रमाणे तुम्हाला चांगले अनुभव देतं. तसेच असंख्य वाईट अनुभवही येतात. तुमच्या आधीपासून त्या हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं तुमच्यावर कशा पद्धतीने रॅगिंग करू शकतात, हे ‘थ्री इडियट्स’ चित्रपट पाहून तुम्हाला साधारण लक्षात आलं असेलच. अशापद्धतीने रॅंगिग झालं तर त्याला भिडणं, प्रतिकार करणं तुम्हाला शिकावं लागतं. सुरूवातीला कदाचित त्रास होऊ शकतो. पण यातून तुम्हाला कणखर बनूनच मार्ग काढावा लागतो. तुम्ही आरे ला कारे केलंत तर रॅगिंग करणारा शांत होऊ शकतो. आजकाल कुठेही सहज मिळणारे प्रकार म्हणजे दारू, सिगरेट, ड्रग्ज…. याच्या आहारी गेलेले लोकं तुम्हाला एकदा घेऊन तर बघ.. असे म्हणत घ्यायला फोर्स करू शकतात. पण आपण या नव्या शहरात नेमकं कशासाठी आलोय याची चांगली जाणीव असेल तर तुम्ही या सगळ्यापासून लांब राहू शकता. कारण अशा नव्या शहरात तुम्हाला मदत करायला, आधार द्यायला तुमचे आई-वडिल नसतात. अशावेळी यापासून लांब राहणंच चांगलं. अर्थात हे सगळं तुमच्यावरच अवलंबून आहे.
पण हॉस्ल लाईफ हे तुम्हाला खऱ्या अर्थाने समृद्ध करतं. तुम्हाला घरच्यांची, त्यांच्या परिश्रमांची किंमत यानिमित्ताने कळते. शिवाय तुम्हीही विविध अनुभव, टक्के-टोणपे खात काय योग्य काय अयोग्य हे शिकता आणि माणूस म्हणून उत्तम घडता. त्यामुळे हा अनुभव घ्यायलाच हवा.