घरचं जेवण आठवतं जेव्हा…
आठवण घरच्या जेवणाची!
टम्म फुगलेली गरमागरम पोळी, त्यावर तूप, माझ्या आवडीप्रमाणे केलेली भेंडीची भाजी, चिंच गुळाची चविष्ट आमटी, आणि हो मसालेभात… अरे लोणचं राहिलंच, दाण्याची चटणी, किंवा कधी नुसता वाफाळता गरम वरण-भात, लिंबू, तूप, मीठ… अहाहा… असं हे आई-आजीने केलेलं जेवण म्हणजे १ नंबर. घरच्या जेवणाला इतर कशाचीही सर नाही म्हणतात ते उगीच नाही, हे मला आता कळायला लागलंय. मी कधीतरी बाहेरचं खाऊन आलो, घरी आईने केलेलं खाल्लं नाही तर, आई म्हणायची, “घरच्या जेवणाची किंमत बाहेर गेलास की कळेल!’ हे आता हॉस्टेलवर राहायला आल्यामुळे कळायला लागलंय. इथे मला घरच्यासारखं जेवण देणारे टिफिन/ डबेवाला/ मेस आहेतच. पण तरीही आईच्या जेवणाची आठवण येते तेव्हा आठवायला लागतात उकडीचे मोदक, गुळपोळी, आजीच्या हातची वेगवेगळी लोणची, चिवडा, आईच्या हातचा मसाले भात, वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या रोजच्या भाज्या, लाडू आणि बरच काही…
हे सगळं डोळ्यासमोर यायचं कारण म्हणजे आता मी शिक्षणासाठी नागपुरवरून पुण्यात आल्यामुळे घरच्या जेवणाच्या आठवणी मनातून जात नाहीयेत. आपली आई, आजी, काकू घरातल्या सगळ्यांचा विचार करून किती निगुतीने विविध पदार्थ करत असतात. एकच पदार्थ पण किती वेगळ्या पद्धतीने करता येतो. आता पालेभाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडायची, पण मला नाही. तर आई मी ती भाजी खावी यासाठी आलू-पालक, पालक पनीर, डाल पालक, लसुणी पालक असे प्रकार करून मला खायला द्यायची. पण ही भाजी मी नावामुळे आणि ती ज्या पद्धतीने प्लॅटींग करायची ते बघूनच खावी वाटायची. मात्र घरच्यांना पारंपारिक पद्धतीने आवडते, तशीत ती करायची. असे कितीतरी प्रकार सांगता येतील. एकदा आईने मला थीन क्रस्ट पिझ्झा दिला. तो मला एक बाईट खाल्ल्यावर प्रचंड आवडला. आधी कळेचना हा काय प्रकार आहे, पण तीने आदल्या दिवशीची मी न खाल्लेल्या भाकरीचा वापर करून त्याला पिझ्झाचा ट्विस्ट दिला होता. थोडक्यात काय तर आपल्या मुलांनी चवदार अन्न यासाठी तिची धडपड सुरू असते. खावं अन्न वाया न घालवता ते कसं वेगळ्या प्रकारे खाता येईल, पोषण कसं मिळेल याचा सतत विचार ती करत असते. शिवाय पदार्थ करताना जो गंध घरभर पसरतो त्याने तर आपली भूक आणखी वाढते.
पण, तुम्ही जेव्हा नवीन शहरात शिकायला, नोकरीला जाता तेव्हा तिथे जेवणासाठी टिफिन/ डबेवाला/ मेस अशा सोयी असतात. तिथल्या मावशी, काकू, आजींनी प्रेमानी आमच्यासाठी दिलेला तो डबा म्हणजे एक वेगळा, मस्त अनुभव असतो. पुण्यासारख्या नव्या शहरात तुम्हाला टिफिन/ डबेवाला/ मेस मधलं जेवण आवडेल असं आहे. ज्याप्रमाणे आपली आई आरोग्याची, चवीची काळजी घेऊन चमचमीत जेवण बनवते. तसा अनुभव तुम्हाला इथे नक्कीच मिळू शकतो. पण घरच्या, आईच्या जेवणाची प्रचंड सवय असलेल्या आपल्याला नव्या चवीशी जुळवून घेताना थोडा वेळ लागतो. भाजी, पोळी, आमटी, भाताची चव नेहमीपेक्षा वेगळी असते. पण नव्या शहरातला गंध त्यात असतो. त्यामुळे तुम्हाला ही नवी चव देताना टिफिन/ डबेवाला/ मेसवाले तुमच्या आरोग्याची काळजी घेऊनच पौष्टीक पदार्थ तयार करतात. महत्वाचं म्हणजे तुमच्या बजेटनुसार ते तुम्हाला घरगुती जेवण देतात. त्यामुळे त्याप्रमाणे पदार्थाची चवही असते. जेव्हा तुम्ही मित्र-मैत्रीणी एकमेकांचा हा डब्बा शेअर करता, तेव्हा तो खाताना किती मजा येते ते आठवा. एखाद्याची भाजी आवडते. तर एखाद्याचा वरण भात, अशावेळी तुम्ही सगळेच घरच्या आईच्या जेवणाचीही आठवण काढत असाल हे नक्की. पण शिक्षण, नोकरीसाठी बाहेर गेल्यावर टिफिन/ डबेवाला/ मेस ही खूप मोठी आणि अत्यंत गरजेची सोय आहे. हे लक्षात असलं की आईच्या हातची चव तुम्हाला कधी यांच्या जेवणात सापडेल ते तुमचं तुम्हाला कळणार नाही. महत्वाचं काय असतं, तर चांगलं जेवण मिळावं! कारण चांगलं जेवण मिळालं की आपला मूड उत्तम राहतो. त्यानेच आपला पुढचं कामही उत्तम होतं. म्हणून मस्त खा!
अरे वाचता वाचता भूक लागली असेल तर… जा पळा… मेसमधलं गरमागरम जेवण तुमची वाट बघतंय!