वेलकम टू आपलं पुणं, आय नो, आय नो, तुम्ही सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, दिल्ली, बंगलोर कुठून कुठून तुमच्या आपल्या शहरातून उच्च शिक्षणासाठी नव्या शहरात आलाय. आता पुढची काही वर्ष तरी पुणं तुम्हाला आपलंस करणार आहे. त्यामुळे चला या शहराशी दोस्ती करूया.
सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या पुणं शहरानं आता जगभरातल्या लोकांना आपलंसं केलं आहे. एकेकाळी पुणं म्हणजे वाड्यांचं शहर होतं. तिथे आता टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. पण असं असलं तरी हे शहर चैतन्याने भारलेलं आहे. तेव्हा या शहरात येताना निश्चिंत मनाने या!
कुठलंही नवं काम सुरू करताना आपण बाप्पाचा आशिर्वाद घेतो. हो ना! पुण्यात आल्यानंतर रूमवर बॅगा वगैरे टाकून रिलॅक्स झालात, आईने दिलेला खाऊ खाल्लानंतर जरा भटकून यावंस वाटेल. तेव्हा थेट जायचं ते दगडुशेठ गणपतीला. नवसाला पावणारा दगडुशेठ गणपती पुणेकरांच्या आदरांचं, भक्तीचं महत्वाचं स्थान आहे. इथे तुम्ही गेल्यावर शांत वाटेल. तुम्ही रिलॅक्स फील कराल. बाप्पाला प्रदक्षिणा घालत असताना एकदम भुकेची जाणीव होईल. दर्शनानंतर काय खायचं याविषयी मनात ठरवत असाल तर खाण्याचे अगणित ऑप्शन्स तुमची वाट पाहत असतील.
पैसे वाचवू, फार महाग नको असा विचार करून नाश्ता करायचा असेल तर बिपीन स्नॅक्स सेटंर, गुरूजी इडली, योगेश्वरी स्नॅक्स सेंटर अशासारखे छोटे फूड जॉईंट्स आहेत. जगातभारी असणारी पुण्यातली मिसळ खायची असेल तर बेडेकर मिसळ, काटाकीर्र मिसळ, जोगेश्वरी मिसळ अशा काही ठिकाणच्या झणझणीत मिसळ खाण्यात जी मजा आहे, त्याचं वर्णन करायला शब्द नाही तर प्रत्यक्ष खाऊन बघणं मस्ट आहे भावा. थाळी खायची असेल तर, सुखकर्ता थाळी, आशा डायनिंग हॉल, श्रेयस, जनसेवा भोजनालय असे काही महाराष्ट्रीयन थाळी खाण्याचे पर्याय आहेत. नॉनव्हेज खायचं असेल तर सुर्वेज, डी.जे. बिर्याणी, वेर्णेकर्स, द फिश थाळी, आपुलकी-भुजबळ बंधू, लाड रेस्टोरंट, बोरूडेज गावरान स्वाद अशी एकसोएक हॉटेल्स मिळतील. सर्वात महत्वाचं पुण्यात आल्यावर वैशाली, रूपाली ही नावं विसरायची नाहीत हे लक्षात ठेवा. थोडक्यात काय जे जे वाटते खावे ते ते मिळेल तुम्हाला इथे…
कॉलेज सुरू झाल्यावर तुमचा बराचसा वेळ अभ्यासात जाणार, पण विकेंडला तुम्हाला इथे फिरण्यासाठी मोक्कार जागा आहेत. तुम्हाला ऐतिहासिक पुणं बघून या शहराचा इतिहास आणि महत्व समजून घ्यायचं असेल तर हे शहर तुम्हाला अगदी मोकळेपणाने तुम्हाला त्यात्या जागा दाखवेल. यासाठी सर्वात महत्वाची जागा म्हणजे ‘शनिवारवाडा’. पेशव्यांचा इतिहास तुम्हाला इथे बघायला, अनुभवायला मिळेल. वाडा आता भग्न अवस्थेत आहे. पण तुम्ही गाईड घेऊन जर फिरलात तर या शनिवार वाड्याचा एकेकाळचा भारदस्त इतिहास तुम्हाला अनुभवता येईल. याशिवाय शिवाजी महाराजांनी ज्या शाहिस्तेखानाची बोटे कापली तो ‘लाल महाल‘ही बघता येईल. बाळ गंगाधर टिळकांचा केसरी वाडा, आगा खान पॅलेस, विश्रामबाग वाडा, सारसबाग अशी काही ठिकाणं तर आवर्जून बघण्यासारखी आहेत.
तुम्हाला जर गड-किल्ल्यांवर भटकायला, ट्रेकिंग- कॅंपिंग करायला आवडत असेल तर तुम्ही पुण्यासारख्या बेस्ट शहरात आलायत! कारण पुण्याच्या ५० किलोमीटरच्या परिसरात अंदाजे १५ किल्ल्यांवर तुम्हाला भटकंती करता येते. त्यात सिंहगड, लोहगड, शिवनेरी, तिकोणा, पुरंदर, विसापूर, राजमाची अशा अनेक ठिकाणी तुम्हाला जाता येऊ शकतं. सिंहगडावर गेलात तर तिथली पिठलं – भाकरी थाळी खायला मात्र विसरू नका. याशिवाय कार्ला कॅव्ह्स, पवना लेक, खडकवासला लेक इथे पावसाळ्यात फिरण्याची मजा औरच.
शॉपिंग करायचं असेल तर मॉल हा पर्याय असतोच सगळीकडे. पण बार्गेन करून शॉपिंग करण्यात खरी मजा आहे. आणि पुण्यात अशी ठिकाणं म्हणजे तुळशीबाग. तुळशीबागेत कपड्यांपासून ज्वेलरीपर्यंत तुम्हाला हव्वं ते स्वस्तात स्वस्त आणि महागात महाग गोष्टी आरामात मिळतील. याशिवाय यंग पब्लिकसाठी एफसी रोड तर बेस्टच. इथे तुम्हाला शॉपिंग करताना खादाडीचे भरपूर पर्याय मिळतील.
इतकं शहरात फिरताना अभ्यास करायचाय हे मात्र लक्षात असू द्या. आणि हो अभ्यास करून डोकं बधीर झालं असेल तर दुर्गा कॅफेतली कोल्ड कॉफी पिऊन चिल मारा. थोडीशी भूक लागली तर इराणी कॅफे, गुडलक कॅफे आहेतच. तर, अभ्यास करा आणि पुणं मनसोक्त एन्जॉय करा.
आता हे सगळं वाचून तुम्हाला पुण्यातल्या आणखी काही गोष्टी जाणून घ्यायची उत्सुकता वाढली ना! त्यासाठी STAY TUNED!